grupi

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा – आरती

  • Home
  • Blogs
  • Aarti
  • उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा – आरती
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो…|| धृ ||

अश्विन शुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्रजप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो
ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||
उदो बोला उदो ….॥धृ॥

द्वितीयेचे दिवशीं मिळती चौषष्ठ योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो
उदो:कारे गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||
उदो बोला उदो ….॥धृ॥

तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कंठींची पदकें कांसे पितांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||
उदो बोला उदो ….॥धृ॥

चतुर्थीचे दिवशीं विश्व व्यापक जननी हो
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहनी हो
भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||
उदो बोला उदो ….॥धृ॥

पंचमीचे दिवशीं व्रत ते उपांगललिता हो
अर्ध पाद्य​ पूजने तुजला भवानी स्तवती हो
रात्रीचे समयी करिती जागरण हरीकथा हो
आनंदे प्रेमें ते आले सद्भावें क्रिडता हो || ५ ||
उदो बोला उदो ….॥धृ॥

षष्ठीचे दिवशीं भक्ता आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||
उदो बोला उदो ….॥धृ॥

सप्तमीचे दिवशीं सप्तशृंग गडावरी हो
तेथे तु नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता झेलुन घेसी वरचेवरी हो || ७ ||
उदो बोला उदो ….॥धृ॥

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगत्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देऊनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||
उदो बोला उदो ….॥धृ॥

नवमीचे दिवशीं नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवनें सद्भक्ती करुनी हो
षड्रस अन्ने नेवैद्यासी अर्पियली भोजनीं हो
आचार्य-ब्राह्मणां तृप्त केले त्वा कृपे करुनी हो || ९ ||
उदो बोला उदो ….॥धृ॥

दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो
सिंहारूढ करि दारूण शस्त्रे अंबे त्वा घेउनी हो
शुंभनीशुंभादीक राक्षसां किती मारिसी रणीं हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तव चरणीं हो || १० ||
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो…|| धृ ||

Contributor – Rajashree Audarya Khankhoje

Our purpose is to build solutions that remove barriers preventing people from doing their best work.

Melbourne, Australia
(Sat - Thursday)
(10am - 05 pm)